मुलांसाठी योग - योगाकडून यशाकडे...
आताचे युग हे संगणकाचे युग आहे. तसेच अनेक
वेगवेगळया क्षेत्रातील स्पर्धेचे ही युग आहे. हया स्पर्धेला वयाचे व विषयाचे बंधन
नाही. हीस्पर्धा अतिशय लहान वयापासून सुरू होते व ती कधी संपतच नाही. या स्पर्धेत
जो जिंकतो तो यशस्वी होतो व जो हरतो तो अपयशी होतो. जो हया स्पर्धेत तग धरू शकतो
तो आत्मविश्वास मिळवतो व स्वत:ची प्रगती करून घेतो, व जो तग धरू शकत नाही तो हरतो, आत्मविश्वासगमवून बसतो. हयातून नैराश्य निर्माण हाते. जीवनाकडे बघण्याचा
दृष्टीकोन नकारात्मक होत जातो. अभ्यासाची नावड उत्पन्न होते. सारासार विचार
करण्याची प्रवत्ती नष्ट होते. हया गोष्टीतूनच विघातक गोष्टी करण्याची मुलांची
प्रवत्ती होते.
जेंव्हा अडीच तीन वर्षाची मुले पाठीवर दप्तर
घेऊन शाळेत जातात. त्यावेळी आजूबाजूच्या बदलणाऱ्या अनेक गोष्टींना सामोरे जात
असतात. शाळेत होणाऱ्या अनेक स्पर्धा व शालेय अभ्यासक्रम हयात आपल्या मुलाने सतत
यशस्वी व्हावे अशी पालकांची तीव्र इच्छा व त्यासाठी पालकांनी केलेले प्रयत्न व
त्या प्रयत्नात मुलांची होणारी शारीरिक व मानसिक ओढाताण. आजच्या गतीमान जीवनामुळे
व बदलत्या राहणीमान व विचारसरणीमुळे पालकांचे मुलांकडे होणारे दुर्लक्ष त्यामुळे
मुलांचा मानसिक कोंडमारा होत असतो. खरे तर शालेय जीवनाचा काळ हा मुलांच्या
सर्वांगीण (व्यक्तीमत्व) विकासाचा अतिशय महत्वाचा काळ. हया वयात ब-याच गोष्टी
पालकांच्या आग्रहाखातर मुलांना मनाविरूध्द स्वीकारायला लागतात. अशावेळी त्यांच्या
मनात प्रचंड वैचारिक संघर्ष चाललेला असतो. अशा काळात मुलांचा व पालकांचा संवाद
साधला गेला नाही तर अशा वैचारिक संघर्षाचा ताण हा मुलांच्यात अस्थिरता निर्माण
हाणे, चिडचिडेपणा वाढणे, हेकेखोरपणा वाढणे, उलट उत्तरे देणे, एकलकोंडा स्वभाव होणे, आत्मकेंद्रित होणे अशा
वागण्यातून बाहेर पडतो. अशा वर्तनाचे मूळ हे घर, शाळा व
आजूबाजूच्या परिस्थितीमुळे निर्माण होणऱ्या मानसिक ताणतणवात असते.
हया व अशा मानसिक ताणतणावाची तीव्रता कमी
करण्यासाठी इ.स. पूर्व 500 वर्षांपूर्वी
जगाचे पालकत्व स्वीकारून महामुनी पतंजलींनीनिर्मिलेल्या योगशास्त्राचा उपयोग
व्यक्तिमत्व विकासासाठी खात्रीलायकरित्या होऊ शकतो.
आजच्या काळात योगाचा अभ्यास म्हणजे केवळ आसन, प्राणायाम, शुध्दी
क्रिया, मुद्रा, बंध, व ध्यानधरणा असे मानले जाते. पण हा अभ्यास इतकाच नसून त्याची व्यापकता 'पातंजल योग सूत्र' हया ग्रंथात, योग:श्चित्तवृत्तिनिरोध: ॥ पातंजल योग सूत्र 1-2 ॥
असे सूत्र सांगून स्पष्ट केली आहे.
योग म्हणजे चित्ताच्या वृत्तींचा निरोध होय.
वरील सर्व साधनांच्या सहाय्याने चित्तवृत्तींचा
निरोध करणे इतकी सर्वंकष अशी हया सूत्राची व्याप्ती आहे. त्याचबरोबर पतंजलींनी
अष्टांगयोग सांगितला आहे. हयामधील पहिली दोन अंगे यम व नियम. यम व नियमांतार्फत्, साधकाने समाजात कसे वर्तन करावे व
साधकाचेस्वत:चे वर्तन कसे असावे हया विषयीचे मार्गदर्शन पातंजल मुनींनी केले आहे.
अशी ही दोन अंगे (यम व नियम) पालकांकडून काही प्रमाणातअंगिकारली जाऊन पालकांकडूनच
मुलांवर अतिशय चांगले संस्कार करता येतील.जीवनाच्या सुरवातीचा काळ हा
विद्याग्रहणाचा काळ असे सर्वसाधारणपणे मानले जाते. अशा हया काळात ज्ञान
संपादण्यासाठी एकाग्रता आवश्यक असते. योगशास्त्राच्या अभ्यासाने, स्मरणशक्ती, आत्मविश्वास यात सकारात्मक बदल घडवून
आणता येतात, त्याच बरोबर शारीरिक व मानसिक वाढ देखील निकोप व
सुदृढ अशी होते.
सध्याच्या
काळात 'व्यक्तिमत्त्व विकास' हा शब्द बराच ऐकिवात येतो.
व्यक्तिमत्त्व विकासाचा संबंध हा उच्चशिक्षण, खेळात, कलेत प्राविण्य मिळवणे हया गोष्टींशी लावला जातो. मग मनात असा विचार येतो
की, व्यक्तिमत्त्व विकासाचे एवढेच पैलू आहेत का? व्यक्तिमत्त्व विकासासाठी घेतल्या जाणाऱ्या 15 दिवसांच्या
किंवा महिन्यांच्या शिबीरांच्या कालावधीत व्यक्तिमत्त्व विकास होऊ शकतो का? मुलाला समजू लागल्या पासून व्यक्तिमत्त्वाचा विकास होत असतो. आजूबाजूला
असलेल्या परिस्थितीचा व घडणा-या घटनांचा मुलांवर परिणाम होत असतो व त्यातून
मुलांचे व्यक्तिमत्त्व घडत असते.
आता
व्यक्तिमत्त्व घडविणे म्हणजे काय करणे? मुलांची अभ्यासात उत्तम प्रगती
असणे, खेळात प्राविण्य असणे, एखादया
कलेत प्राविण्य मिळवणे असे आहे का? पण हयातून ज्या मुलांना
हया गोष्टी जमतात साहजिकच त्यांना प्रत्येक गोष्टीत यश मिळत गेल्यामुळे आपल्याला
यश हे मिळणारच अशी ठाम समजूत होते व त्या मुलांकडून पालकांच्या व समाजाच्या
अपेक्षा वाढतात. प्रत्येक वेळी यश मिळेलच अशी भावना वाढीस लागते व त्यातून फाजील
आत्मविश्वास वाढत जातो. अशावेळी कधी अपयश आले तर ते अपयश स्वीकारण्याची मनाची
तयारी नसते. त्यातून निर्माण होणारे ताणतणाव हे अटळ असतात. हया ताणतणावांना मुलं
समर्थपणे तोंड देऊ शकातात का? ह्याचे रूपांतर हट्टीपणात
होते. एक ही बाजू, तर दुसरी बाजू हया गोष्टी मुलांना जमल्या
नाहीत तर त्या मुलांमध्ये निर्माण होणारा न्यूनगंड- त्यातून मुलांमधे हाणारी
तुलना- हया तुलनेतून अपयश मिळाले तर मुलं आपला न्यूनगंड लपवण्यासाठी एक तर आक्रमक
बनतात किंवा प्रत्येक गोष्टीत माघार घेऊन ती गोष्ट न करण्याकडे त्यांचा कल होत
जातो.
व्यक्तिमत्त्व
विकासाच्या दृष्टिकोनातून शारीरिक, मानसिक, बौध्दिक,
भावनिक, आरोग्य हयांचे निकोप संवर्धन होणे हे
महत्वाचे पैलू मानता येतील. पतंजली मुनींनी सांगितलेल्या 'अष्टांग-योगा'ची ढोबळ मानाने दोन विभागात विभागणी होते.
१. बहिरंग योग (यम, नियम,
आसन, प्राणायम)
२. अंतरंग योग (प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी)
२. अंतरंग योग (प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी)
बहिरंग
योगातील प्रथम चार भाग- यम, नियम, आसन,
प्राणायम व अंतरंग योगातील धारणा ध्यान समाधी व हया दोहोंना जोडणारे
'प्रत्याहार' हे अंग आहे. एकूण
व्यक्तिमत्त्व विकास हा योगाभ्यासाने लाभणारा तात्काळ फायदा जरी असला तरी, योगाचा दीर्घ परिणाम हा आपल्या संस्कृतीप्रमाणे तसेच योगसाधनेनुसार,
मोक्षाकडेच घेऊन जाणारा असतो.
हया
आठ अंगांपैकी पहिली दोन अंगे यम, नियम हयांचा मानसिक व भावनिक
संवर्धन करणे व आसन, प्राणायाम यांचा शारीरिक आरोग्य,
बौध्दिक संवर्धन करणे हयासाठी उपयोग होऊ शकतो.
यम, नियम
ह्यामुळे मानसिक व भावनिक संवर्धनाला सुरवात होते. व्यक्तिच्या वर्तणुकीवर त्याचे
चांगले परिणाम दिसण्यास सुरवात होते. विस्ताराने यम व नियम यांची माहिती पुढे
येईलच, परंतु थोडक्यात सांगायचे झाल्यास, यम व नियम हे मनास वळण लावणारे गुण आहेत. अहिंसा, अपरिग्रह
अशा काही न करण्याच्या तसेच ईशस्तवन अशा काही आवर्जून करण्याच्या गोष्टींची एक
जंत्री म्हणजे यम व नियम होत. आसन व प्राणायाम यांमुळे
प्रामुख्याने शारीरिक व बौध्दिक संवर्धनास ब-याच प्रमाणात मदत होते. यम नियमांच्या
पालनाने मानसिक व भावनिक संतुलन साधत असतानाच आसन व प्राणायामामुळे होणारे शारीरिक,
बौध्दिक, वैचारिक बदल एकमेकांना पुष्टी देत
व्यक्तिमत्त्व विकासातील मोठे कार्य... पायाभरणीचे कार्य सुरू करतात. अशा रितीने
व्यक्तिमत्त्व वृध्ंदिगत होत असतानाच बालकांच्या मनावर होणारे संस्कार सुध्दा
विचारात घ्यावे लागतील. काळानुरूप घडणाऱ्या बदलांमुळेच आपोआपच मुलांवर होणारे
संस्कार सुध्दा बदलत आहेत. हया संस्कारांची चांगली वाईट पातळी ही देखील
व्यक्तिमत्त्व विकासात महत्वाची ठरू शकते. घर, शाळा, समाज हया माध्यमातून होणारे संस्कार व हया ठिकाणी असणारे वातावरण सुध्दा
व्यक्तिमत्त्व घडविण्यास कारणीभूत ठरते.
यम
नियमांचे पालन पालकांपासून समाजापर्यंत जर रूजत गेले तर आपल्या समाजाचे प्रतिबिंब
आदर्शवादी ठरू शकते. इतका दुरोगामी परिणाम प्राप्त करणारी ही सर्वंकष अशी
अष्टांग-योग पध्दती आहे. आसन व प्राणायाम ही दोन अंगे- सुडौल शारीरिक बांधा, आरोग्य,
एकाग्रता, स्थिरता आणि त्यातून मिळणारी
संतुलित बौध्दिक व वैचारिक पातळी या सा-या गोष्टी प्रत्यक्षाप्रत्यक्षपणे, व्यक्तिमत्त्व विकासास पूरक ठरतात. हे आसन व प्राणायामाचे फायदे आहेत.
आजच्या
ऐहिक जीवनात स्पर्धेला तोंड देण्यासाठी आसन प्राणायाम हया दोन गोष्टी अत्यंत
महत्वाच्या. त्यांच्या अनुशंगाने सारासार विचार करण्याची प्रवृत्ती वाढीस लागते व
चूक-बरोबर, वाईट चांगले हयातील फरक समजून घेण्यास मदत होते. हया जोडीला यम, नियम, यांचेदेखील काटेकोर पालन झाले तर, त्यावेळेस मूल उज्ज्वल यशाकडे मार्गक्रमणा करू लागते. हया गोष्टी लिहिण्यास व बोलण्यास खूप सोप्या वाटत असल्या तरीही आचरणात
आणण्यास खूप अवघड आहेत. कारण हयांचा परिणाम दिसून येण्यास खूप जास्त काळ वाट
पाहावी लागते, व हे परिणाम प्राप्त होईपर्यंत आणि प्राप्त
झालेले परिणाम कायम स्वरूपी टिकून राहण्यासाठी, योगाचा सराव
सातत्याने करणे ही अत्यंत आवश्यक बाब आहे.
- सौ. चारूता प्र. फाळके
मुंबईच्या
चारूता फाळके हयांनी योग विषयाची पदवी प्राप्त केली असून, त्या
योग-प्रशिक्षक आहेत. निरनिराळया रोगांवर त्या योग-पध्दतींचा वापर करून उपचार
सुचवितात, तसेच मुलांच्या व्यक्तित्त्व विकासाकरिता
कार्यशाळा घेतात.
1 टिप्पणी:
👍👌👌अतिशय महत्त्वाचा व माहितीपूर्ण लेख आहे..
टिप्पणी पोस्ट करा